शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

सातारा




सातारा
क्षेत्रफळ १०,४८०.० चौ. कि. मी.
तालुके :-सातारा,कराड,वाई,फलटण,महाबळेश्वर,खटाव,माण,कोरेगांव ,पाटण,जावळी,खंडाळा
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतात सुध्दा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांच्या अस्तित्वाने पावन झालेला व त्यांची समाधी असलेला आणि छत्रपतींच्या गादीचे स्थान असलेला सातारा जिल्हा. महाबळेश्र्वरसारखे निसर्गरम्य ठिकाण असलेला, तसेच सुंदर कृष्णाकाठ लाभलेला आणि शिक्षणाची गंगोत्री असलेला हा जिल्हा. या जिल्ह्याने देशासाठी सर्वांत जास्त (संख्येने) बलिदान दिले असल्यामुळे याला शहीद सैनिकांचा जिल्हा असेही म्हणावे लागेल. या जिल्ह्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली. याच जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने (संयुक्त) महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले. यशवंतराव यांनी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास साधला; केंद्रीय पातळीवरही परिपक्व नेते म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे. जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर असल्याने येथे हवामान थंड व आल्हाददायक असते. पावसाचे प्रमाण विषम असून, पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात, महाबळेश्वर भागात पाऊस जास्त पडतो, तर पूर्वेकडील खटाव, माण या तालुक्यांत तो अतिशय कमी पडतो.

सागरेश्वर

कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत.

सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे.

सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

महाबळेश्वर






सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.