शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

सातारा




सातारा
क्षेत्रफळ १०,४८०.० चौ. कि. मी.
तालुके :-सातारा,कराड,वाई,फलटण,महाबळेश्वर,खटाव,माण,कोरेगांव ,पाटण,जावळी,खंडाळा
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतात सुध्दा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांच्या अस्तित्वाने पावन झालेला व त्यांची समाधी असलेला आणि छत्रपतींच्या गादीचे स्थान असलेला सातारा जिल्हा. महाबळेश्र्वरसारखे निसर्गरम्य ठिकाण असलेला, तसेच सुंदर कृष्णाकाठ लाभलेला आणि शिक्षणाची गंगोत्री असलेला हा जिल्हा. या जिल्ह्याने देशासाठी सर्वांत जास्त (संख्येने) बलिदान दिले असल्यामुळे याला शहीद सैनिकांचा जिल्हा असेही म्हणावे लागेल. या जिल्ह्यातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली. याच जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने (संयुक्त) महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले. यशवंतराव यांनी केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकास साधला; केंद्रीय पातळीवरही परिपक्व नेते म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे. जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर असल्याने येथे हवामान थंड व आल्हाददायक असते. पावसाचे प्रमाण विषम असून, पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात, महाबळेश्वर भागात पाऊस जास्त पडतो, तर पूर्वेकडील खटाव, माण या तालुक्यांत तो अतिशय कमी पडतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा