गुरुवार, १ जानेवारी, २०१५

आता पोस्टाचेही ‘एटीएम’

 
टपाल खात्याची बँकिंग सुविधा देण्याची मनीषा पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारतर्फे खात्याच्या ठराविक शाखांना बँकिंग सुविधा देण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या शाखांमधून खातेधारकांना खासगी बँकांप्रमाणे पासबुकऐवजी एटीएम कार्ड आणि अकाउंट स्टेटमेंट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंगळवारी केंद्र सरकारने 'पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक जनरल रूल्स १९८१'च्या अधिनियमांमध्ये बदल करीत असल्याची अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध केली आहे. हे बदल तत्काळ लागू होणार आहेत. टपाल खात्याच्या ज्या शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे, तेथे कोअर बँकिंग सोल्युशन सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. जेणेकरून 'ई-पेमेंट'ची सुविधा सुरू करता येणार आहे. सध्या टपाल खात्यातर्फे बचत खाते, आवर्ती खाते, मुदत ठेव आणि अल्पबचत योजना आदी सुविधा ग्राहकांना प्रदान करण्यात येतात. या शिवाय नोकरदारांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाची सुविधाही देण्यात येते.

देशात आजमितीला १.५५ लाख टपाल कार्यालये असून, या माध्यमातून ९० टक्के ग्रामीण भागात सेवा देण्यात येते. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेमार्फत लवकरच ठरावीक शाखांमध्ये एटीएम मशिन बसविण्यात येणार असून, ग्राहकांच्या मागणीनंतरच त्यांना डेबिट कार्ड देण्यात येणार आहेत. या शिवाय संबंधित शाखांमधील कोअर बँकिंग सेवेच्या मदतीने पैसे काढणे अथवा भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टपाल खात्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवीदेखील कोअर बँकिंगच्या माध्यमातून काढून घेणे आता शक्य होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा